सिल्लोड येथे देशी दारू पकडली, गुन्हा दाखल

Foto
▶ कारसह २ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त एकाला अटक; दोन संशयित पसार 

सिल्लोड, (प्रतिनिधी) काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने कारमधून विनापरवाना देशी दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. 

भराडी सिल्लोड रस्त्यावर हॉटेल विसावासमोर शनिवारी (दि. ५) रात्री १० वाजता केलेल्या कारवाईत देशी दारूच्या १९६ बाटल्या व मारुती सुझुकी वॅगनआर कार असा एकूण २ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी देविदास हिरामन सुरे (रा. मांडगाव, ता. सिल्लोड) यास पोलिसांनी अटक केली असून, दोन संशयित पसार झाले आहेत.

भराडी येथील शासनमान्य देशी दारू विक्री दुकानातून विनापरवाना दारू कारमध्ये भरून ती काळ्या बाजारात विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी भराडी ते सिल्लोड रस्त्यावर हॉटेल विसावासमोर सापळा रचला. संशयित कार येताच पोलिसांनी ती अडवून झडती घेतली. 

त्यामध्ये देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. कारवाईत १८० मिलीच्या भिंगरी संत्रा देशी दारूच्या ९६ बाटल्या, किंमत ९ हजार ६०० रुपये, ९० मिलीच्या १०० बाटल्या, किंमत ५ हजार रुपये, असा एकूण १४ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. याशिवाय अंदाजे २ लाख ३० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी वॅगनआर कार जप्त करण्यात आली. 

या प्रकरणी देविदास हिरामन सुरे याच्यासह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तसेच भराडी येथील शासनमान्य देशी दारू दुकानाच्या चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरे यास अटक करण्यात आली आहे. अन्य दोन संशयित पसार झाले आहेत. 

ही दारू काळ्या बाजारात नेमकी कुठे विक्रीसाठी नेली जात होती. या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहेत. ही कारवाई सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व सिल्लोड ठाणे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार यतीन कुलकर्णी करीत आहेत.